Just another WordPress.com site

किडा २

दारातला कढीपत्ता… त्यावर कीड लागलीय … झाडाची कीड म्हणजे आपल्या दृष्टीने वाईटच … जातच नाही मेली . पण पानं किडली म्हणजे नक्की कशानी ते जरा निरखून बघितलं , तर इतका बारकासा किडा, येणाऱ्या कोम्बांना चिकटून बसलेला होता. अगदी तोच रंग
जो झाडाच्या डहाळीचा होता … कह्हि काह्ही फरक नव्हता झाडाच्या आणि किड्याच्या रंगात !

विचार पहिला :
धन्य तो निसर्ग , कशी प्रत्येक जीवाची काळजी घेतलीय त्याने , प्रत्येकाच्या survival साठी वैशिष्ट्यपूर्ण रचना , विशेष रंग , आकार, पोत, नखं ई . ई .

विचार दुसरा :
एकरूपता किती महत्वाची असते हे माणसांनी निसर्ग आणि तदनिर्मित जिवांकडून शिकलं पाहिजे नै ? मग ती आपल्या धेय्याप्रती असो , करत असलेल्या कामाप्रती ,स्वप्नांप्रती वा आपल्या माणसांप्रती … इतकं बुडून जावं कि समोरचा शोधत राहायला हवा ,
आपला आणि आपल्या ध्यासाचा रंग एक झाला पाहिजे…

जब्या…

” जब्या शहरातून गावात आला होता सुट्टीवर… शहरी चांगली नोकरी होती, बायको- पोरं… सगळं झाक चालल होतं. आज बरंच  दिवसांनी गावात आला होता .
सायकलीच्या दुकानासमोर बसला होता. समोरचं घर तर शालुचं … लेका हि तर शालूच !!
कित्ती  बदललीय, काखेत पोर !… “
जब्याला आपलं आपलंच हसू  येऊ लागलं. शाली कित्ती आवडायची नई आपल्याला … ते दिवसच वेगळे होते, मंतरलेले। तिची वेणी, वेणीतलं  फुल,
नाजूक हसणं ! गावची टारगट पोरं… छोट्या छोट्या गोष्टी। सायकलीवरून फिरणं, हलगी वाजवणं ,जीनच्या प्यांटच सुद्धा केवढा अप्रूप !
पिढीजात चालत आलेली गंदी कामं … त्यावेळचा तो प्रसंग , कुस्तीच्या स्पर्धेदिवाशीचा !
खरच एक माणूस दुसर्या माणसाशी असं कसं वागू शकतो आणि का !  आणि दुसरा माणूस सारं  गप्प सहन करत राहतो! माझ्या बापाला डुक्कर
पकडलं जाण्यातच धन्यता … हे आपला काम, गावात राहायचं आहे मला कुणी हाकलून लावला तर !!! ची भीती !!
त्याची असहाय्यता … गरिबीच्या अधीन तो … आणि मी? मी लाजेने चूर … शरमच साली जगण्याची!  माझं  वयही तसंच … किशोर वय लाजरं
बुजरं! तेव्हा तीही झाडाखाली बघून माझी अवस्था पाहत होती, माझी चेष्टा करत होती सगळ्यांत सामील होऊन. का होईना मी जिद्दीनं शिकलो ,
शहरी आलो… जुनी कामं सुटली, गावात घाण  नि डुक्कर पण नाहीत आताशी !
बदलत चाललंय  सगळं , या बदलात माझा पण हात असेल असा प्रयत्न राहील माझा … सवलत मिळेल तिथं जातीचा अभिमान आणि नंतर आपल्याच
बांधवांची दयना बघत डोळेझाक करायची असं नाही करणार मी … त्याचं दुखः समजुन घेतलाच पाहिज माणुंस म्हणवणाऱ्या प्रत्येकानी…
नाहीतर मग डुक्कर पकडणार्या माझ्या कुटुंबाचा तो दयनीय खेळ बघणारे गावचे ते टगे … आणि थिएतराट बसून पडद्यावरची मजा  पाहणारे शहरी टगे 
यात फरक तो काय !! 
 

देव

माणसं दैववादी का होतात? मंदिराच्या बाहेर लागलेल्या ह्या इतकाल्या रांगा , नारळ फुले,
उदबत्त्या नि देणग्यांच्या पावत्या फाडून नसते स्तोम का माजवतात ? कसे काय इतके आधीन होतात
असा मनात येतं बरेचदा !
मनुष्य स्वार्थी, माणसाचं नेहमी बचावात्मक तंत्र असतं ! आपली चूक सहसा काबुल करायची नाही, जबाबदारी दुसर्यावर ढकलायची हा अंगभूत गुणच !

मग जेव्हा जबाबदारी ढकलण्यासाठी , चुका लपवण्यासाठी दुसरा माणूस भेटत नाही तेव्हा देवाची आठवण होते.

“दारू आरोग्यास वाईट आहे. मी बरबाद झालो, देवा, माझे सारे उपाय थकले, आता तूच मला यातून बाहेर काढ. ”
“हा आमचा मुलगा आमचा काहीही एकात नाही. देव, आता तूच याला अक्कल दे !” असे देवाला ड्युटीवर नेमले
की आपली शिफ्ट जणू संपलीच ! आणि एत्चित कार्यभाग साधला नाही की मग ‘ इतके नवस केले , उपवास केले
पण पदरी काय आले!!’ अशी देवाच्याच नावाने ओरड !
एकूणच देव हा मनुष्यासाठी इतका सोयीस्कर घटक झाला आहे की प्रसंगी त्याला मनवण्यासाठी, त्याचा मन राखण्यासाठी
देणग्यांची भली मोठी लाच घेऊन रांगेत उभे राहण्याची वेळ येते… एखद्या सरकारी ऑफिसात रांगेत उभे राहावे तसे !

परवा महाद्वार रोडवरून फिरत असताना एका छानशा पर्सने लक्ष वेधून घेतलं …एथनिक स्टाईल ची हि सुंदर, छोटीशी मनी – पर्स मला खूपच भावली .
तिच्यावरचं सुंदर कोयर्यांचा डिझाईन, जरीची लेस , मोबाईल साठी छानसा कप्पा अशा त्या साऱ्या सुंदर गोष्टीना भाळून मी ती पर्स खरेदी केली …

घरी आले. माझ्या पुराण्या काळ्या लेदर पर्समधले पैसे, क्रेडिट कार्ड , लायसन्स लागलीच नव्या पर्स मध्ये शिफ्ट केले आणि त्या काळूबाई पर्स ला राम राम ठोकला …
ती पर्स घेऊन परवा एका गर्दीच्या ठिकाणी गेले आणि काहीतरी खरेदी करण्यासाठी पर्स उघडली पैसे द्यायला म्हणून ! नि काय … डाव्या बाजूच्या कप्प्यातून कार्ड लायसन्स टपटप खाली पडलं …त्यानंतर आकडा काही चिल्लर रस्त्यात पडून गेले… आणि एकदा कप्प्यात ठेवलेला मोबाईल काही केल्या बाहेर निघेना …३-४ दिवसातच या सुंदर नव्या पर्सला डिबार करून सर्व वस्तू परत आकडा माझ्या उपयुक्त अशा काळ्या पर्स मध्ये भरल्या…
वस्तूनि काय किंवा माणसानं काय नुसता सुंदर असून चालत नाही …तर उपयुक्त असला पाहिजे !शरीरानी , मनानी सुंदर तर असावाच… पण त्या हि पेक्षा उपयोगी असावं …

सौन्दर्याच कौतुक काही दिवस होईल पण उपकारांची आठवण दीर्घकाळ ठेवली जाते .

अर्रर्र …मेलेल्या बेडका वरून माझ्या गाडीचा चाक गेलं ..श्शी …अगदी कसंसंच झालं त्या लगद्याकडे पाहून. हातून काहीतरी गलत घडल्यासारखी भावना झाली , नि नकळत मी त्या बेडकाला नमस्कार केला .
तशी मी फारशी श्रद्धाळू नाही…पण तरीही… बेडूक म्हणजे लक्ष्मी असं काहीसं आज्या -आयांनी कधीतरी सांगितलेलं माझ्या अंतर्मनाला चिकटून राहिला असावं !म्हणूनच त्या किळसवाण्या दिसणाऱ्या मृत बेडकाला मी नमस्कार केला बहुतेक!
पण, नंतर माझ्या असा लक्षात आलं कि , मला दोषी वाटण्याच काहीच कारण नाहीये , माझ्या गाडीचा चाक ज्या बेडकावरून गेला तो तर आधीच मेलेला होता … मग मी त्याचा आणखी लगदा केला काय किंवा त्याला नमस्कार केला काय…. त्याच्यापर्यंत काहीच पोचला नसावा कि त्याच्यातल्या लाक्ष्मिपर्यंत !
खरंच प्राणी काय माणूस काय … जिवंत आहे तोपर्यंत सारे लागे-बांधे, राग -लोभ, भावना… जो मृतवत जगतो त्याला ना लाथाड्ल्याचं दुखं ना नमस्काराचा सोस ! नाही का?

हजारो पांढरे शुभ्र घोडे -युनिकोन्स!…ते दौडत येत होते अदृश्यातून अवतरत पुढच्या क्षणाला पुन्हा अदृश्यातच विलीन होत, पण त्यांच्या क्षणभरच्या अस्तित्वातच एक मोहयुक्त आकर्षण दडलेले होते…
जादूच्या, राक्षसांच्या, परीच्या कहाण्यांमधल्या मोठ्ठाल्या उकळत्या कढईतील पांढऱ्या धुरातून हे घोडे उसळत येत, आपल्या मनावर मायावी पाश टाकून निघून जात,
मागे मृगजळ ठेवून!
कर्नाटक जवळील “गोकाक” धबधबा…उंचावरून कोसळणारा पांढरा शुभ्र जलौध … एक दैवी अनुभव होता…निसर्गाचा जादूचा प्रयोग…उंचावरून कोसळणाऱ्या जलतुषारांचे उठलेले मोहोळ आणि त्याचबरोबर माझ्या मनात उठलेले एक मोहोळ..
मौसम पर्यटकांसाठी पर्वणीचा होता, गोकाक येथे प्रचंड गर्दी, पंढरीच्या वारीइतकी गर्दी.. माणसांचे शेकडो पुंजके एका बाजूला आणि दुसरीकडे निसर्ग…मधोमध जलौध ,आव्हान देणारा..मानवाच्या कृत्रिम शक्तीला..पण निसर्गापुढे माणूस शूद्रच..निसर्ग बाप आहे. निसर्गाबद्दल मानवाला एक भीतीयुक्त आकर्षण कायम राहिलेले आहे.
पण तरीही त्या कोसळत्या लोटांच हे आव्हान स्वीकारलं एका इवल्या पक्षानं..त्या बेभान, भरधाव, पिसाटलेल्या घोड्यांच्या ताफ्यात शिरकाव केला त्याने… तिथे जमलेल्या एकही मानवप्राण्याला ते जमलं नाही बरं का!

एका अनोख्या चष्म्यातून पाहिलेलं, मुंबईचं अनोखं जग !
चार माणसां भोवती फिरणारी ही कथा … ह्यापैकी प्रत्येक व्यक्तीची जगाकडे पाहण्याची दृष्टीच वेगवेगळी आहे… समाजातील वेगवेगळ्या स्तरातील ह्या चार व्यक्ती…
फक्त पोटासाठीच जगणं माहित असणारा पण एकीकडे काही स्वप्नं बाळगणारा धोबी- मुन्ना , हाडाचा चित्रकार अरुण , त्याच्यावर प्रेम करणा…री आणि मुंबई शोधू पाहणारी उच्चशिक्षित आधुनिक शाय,
आणि अरुण च्या चित्राचा विषय बनलेली नूर ….
प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा नजरिया चं वेगळा …साधा पावसाचंच घ्या नं…. धो धो पावसात मुन्ना चा आपलं गळक घर वाचवण्याचा प्रयत्न … अरुण त्याच पावसात आपला व्हिस्की चा ग्लास धरून त्याच्या शी एकरूप होवू पाहतोय … तर शाय स्वतःच्या अलिशान गाडीतून पावसाकडे पाहतेय …
एखादी कलाकृती पूर्ण होण्यासाठी त्या कलाकाराला एका प्रोसेस मधून जावे लागते … कोणतीही कलाकृती उगाचच घडत नाही …अशाच प्रकारे अरुण चा चित्र पूर्ण होतानाच्या प्रक्रियेत नूर चा आयुष्य उलगडत जातं..
हा चित्रपट म्हणजे एक वेगळाच प्रयत्न आहे … मुद्दाम काहीतरी वेगळा पहायचं या हेतूने बघायला जा, नेहमीच्या फिल्म्स सारखं नाच गाणी , स्टार्ट टू एण्ड पकडून ठेवणारी स्टोरी इथे नाही, पण तरीही कुठेतरी जवळची वाटतात ही माणसं… चार माणसाचं उलगडणार जीवन आणि त्याबरोबर उलगडत जाणारी मुंबई… मुंबई डायरीज …
– सुखदा

रंगमंदिरात प्रवेश करताच एक वेगळाच फील आला , नेहमी पुढच्या बाजूला असणारा रंगमंच आणि मागे प्रेक्षकांसाठी असणाऱ्या खुर्च्यांच्या रांगा…पण आज नजारा काही वेगळाच होता,
गोलाकार मांडलेल्या खुर्च्या ?… जणू नाटकंच रंगमंचा वरून खाली उतरून प्रेक्षकांना भेटायला आलंय… त्यांच्याशी गप्पा मारायला …खरंच ,नाटकाचा सेट, नेपथ्य खूप आवडलं, आज काहीतरी छान वेगळं पाहायला मिळणार याची खात्री पटली…
नात्यातल्या प्रेमाच्या शोधात असलेले चिन्मय आणि केतकी…आनंद प्रेम मिळवण्यासाठीचा त्यांचा शोध …जो आनंद आतून नाही मिळत तो बाहेर शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यासाठी त्यांनी धरलेला मॉल चा रस्ता. आणि त्या झगमगत्या दुनियेत हरवून बसलेले ते …
एकमेकांना की स्वतःलाच?
आजच्या presentation ला महत्व असणाऱ्या जगात हेच तर घडतंय …आपण दुसर्याला आवडेल ते काहीबाही बडबडत राहतो आणि मनच सांगणं राहूनच जातं…एकप्रकारचं कोरडेपण कोडगेपण जाणवत नात्यांत …
उत्कृष्ट नाटक आहे …प्रतीकात्मक बाहुला बाहुली, विवाह संस्थेचा आणि व्यापाराचा इतिहास वाचन सगळ्याच वेगवेगळ्या कन्सेप्ट्स नी नाटकात जान आणली.
एका अद्भुत अशा जत्रेत जाऊन खूपच छान वाटलं …. 🙂

आजकाल आपल्याला फक्त एकंच आकाश माहित आहे … चौकोनी आकाश

भरपूर इमारतींची दाटी असणाऱ्या वस्त्या, अगदी समोर समोर येणाऱ्या शेजाऱ्यांच्या खिडक्या , बाल्कनी नसणारे फलाट, सगळं कसं बंद.. प्रायव्हसी जपणारं !
दिवसभराच्या कामाचं टेन्शन , दुखणार डोकं त्यामुळे सकाळही फ्रेश जात नाही… उठल्या उठल्या कामाची गडबड, पॉश ए सी ऑफिसेस, त्यामुळे कळतंच नाही
बाहेरचा वातावरण… मग आठवडा भराचा ताण, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी उशिरा उठणं…नाईट पार्टीज…

विसरूनच गेलोय न मोकळं खुलं आकाश शेवटचं कधी पाहिलं होतं ते …सकाळच्या प्रहरीचं लख्खं सोनेरी निस्सीम आकाश… आठवतंय ?
की डोळ्यांत ताकदच उरली नाहीय ते तेज झेलायची? डोळ्यांना फक्त एकाच मर्यादित चौकोनी आकाशाची सवय होऊन गेलीय का?
विंडोजच्या चौकोनी आकाशाची… मोनिटार नामक !

Tag Cloud